Sunday, May 29, 2011

एक दुर्लक्षित मित्र

एक दुर्लक्षित मित्र

आपल्या आसपास काही प्राणी दुर्लक्षित असतात. काही प्राण्यांना आपण गृहीत धरतो. असाच एक प्राणी आहे डुक्कर. आदिवासी समाजात डुक्कर हा प्राणी फार महत्त्वाची भूमिका बजावतो. अनेक सणावाराला आणि महत्त्वाची मेजवानी देण्यासाठी डुकराच्या मांसाचे फार महत्त्व आहे. डुक्कर हा आकाराने फार मोठा प्राणी असल्याने एकटय़ा कुटुंबासाठी त्याचे मांस जास्त होते. त्यामुळे समूहातच मांसाचे वाटे केले जातात.
प्रत्येक आदिवासींच्या घरासमोर खास डुकरांसाठी लाकूड आणि कवेलूंचा उपयोग करून तयार केलेलं एक घर असतं. त्याला ‘पदगुडा’ म्हणतात. (गोंडी भाषेमध्ये पदी म्हणजे गावठी डुक्कर आणि गेडापदी म्हणजे रानटी डुक्कर) लोक सांगतात की, डुकराचे घर हे आतून फारच स्वच्छ असतं. डुक्कर हा आपल्या घरात कधीच घाण करत नाही. मेंढय़ात ८-१० पिलांच्या कळपासह आरामात चाललेली डुकरीण बघितली की, जगाची चिंता न करता आपल्याच मस्तीत चाललेल्या परम योग्याची आठवण येते. आपल्या पिल्लांना दूध पाजताना डुकरीणीच्या चेहऱ्यावरचा परम तृप्तीचा भाव प्रत्येक क्षणाला जीवनाचा आनंद लुटणाऱ्या तपस्वीची आठवण करून देतो.
डुक्कर हा प्राणी खरं म्हणजे गाढवाच्या स्वभावासारखा आहे असं वाटतं. शांत, समजूतदार. आपण या जगात कशासाठी आलो आहोत याची पुरेपूर जाणीव असलेला आणि सदासर्वदा आपल्या ध्येय प्राप्तीच्या प्रयत्नात असलेला हा प्राणी! हा प्राणी कोणालाही त्रास देत नाही, आरडाओरड करत नाहीत, चावत नाही, त्याची काळजी घेणे फार सोपे, पण रानडुकरांच्या बाबतीत असं नाही. त्याचा स्वभाव उग्र, तो मस्तीखोर, त्याची शिकार करणे अवघड, तो शेतीचे नुकसान करतो, माणसांवर हल्ला करून त्याला गंभीर दुखापत करू शकतो. रानडुकराचं २०० किलोचं धुड जेव्हा माणसावर आदळतं तेव्हा त्याचं काय होत असेल? कल्पना करा. प्रा. सुकुमाराचं हत्तींवरचं पुस्तक वाचत होतो. हत्ती शेतीची नासधूस कशी करतो, माणसांवर हल्ला कसा करतो याचं फार चांगलं वर्णन त्यांनी आपल्या पुस्तकात केलं आहे. मला हत्तीत आणि रानडुकरात बरंच साम्य आढळतं. त्यांची शेतीची नासधूस करण्याची पद्धत सारखीच वाटते. म्हणजे खाणं कमी नाश जास्त!
आदिवासींकडे असलेल्या संपत्तीबद्दल आश्चर्य वाटत आलं आहे. त्यांच्या संपत्तीत शेती, पाळीव प्राणी यांचा फार मोठा सहभाग असतो. त्या संपत्तीतला डुक्कर हा महत्त्वाचा घटक. ती आदिवासींची एक प्रकारची जिवंत संपत्ती आहे. ते प्रत्येकाकडे असायलाच हवे,नाहीतर तुम्ही गरीब समजले जाण्याची शक्यता असते. मेंढय़ात प्रत्येक घरात सरासरीने ५ ते ६ डुकरं आणि २ ते ३ कुत्रे तरी असतात. सकाळीच पदगुडय़ातून मुक्त केलेली डुकरं दिवसभर गावाच्या आसपास चरत असतात. संध्याकाळी त्यांना पदगुडय़ात पुन्हा बंद केले जाते.
प्राण्यांचा अभ्यास करताना वाटतं, आपण काही प्राण्यांवर अन्यायच केलेला आहे. यातील तीन प्राणी म्हणजे पाळीव डुक्कर, गाढव आणि पाळीव कुत्रा. हे तीनही प्राणी ग्रामीण भारताचे फार महत्त्वाचे भाग असूनही, या प्राण्यांचा परिस्थितीकीय अंगाने, स्वभावावर फारसे अभ्यास झालेले दिसत नाहीत.
डुकरांबद्दल थोडी अधिक माहिती जाणून घेऊ या. सस्तन प्राण्यांच्या सुईडी (Suidae) या परिवारातली डुक्कर ही जात. ज्याला शास्त्रीय भाषेत सस स्क्रोफा (Sus scrofa) म्हणतात. पाळीव डुक्करं ही त्याची उपजात (Sus scrfa domestica). भारतात आढळणाऱ्या जंगली डुकरांना सस स्क्रोफा क्रिस्टाटस (Sus scrfa cristatus) म्हटलं जातं. भारतात वाघाचं डुक्कर हे महत्त्वाचं खाद्य आहे.
७ ते ९ हजार वर्षांआधी मानवाने डुकराला पाळायला सुरुवात केली असावी. जगभरात वेगवेगळ्या ७ प्रदेशांमध्ये एकाच वेळी जंगली डुकराला मानसाळण्याची सुरवात झाली असावी, असे अभ्यासक सांगतात. मांसासोबतच त्यांची मजबूत हाडे शेकडो वर्षांपर्यंत आयुधं आणि ढाली बनवण्यासाठी वापरात होती आणि त्याच्या केसांचा उपयोग तेव्हाही आणि आताही ब्रश तयार करण्याकरिता केला जातो. एखाद्या व्यक्तीला निर्बुद्ध, अस्वच्छ, आळशी म्हणून हिणवण्यासाठी आपण डुक्कर या शब्दाचा उपयोग करतो. प्रत्यक्षात मात्र, डुक्कर हा फार बुद्धिमान प्राणी आहे. कुत्रे आणि मांजरापेक्षाही जास्त चांगल्या पद्धतीने त्यांना प्रशिक्षित केले जाऊ शकते असे अभ्यासक मानतात. जगभर हा प्राणी आढळतो.
जगभरातल्या आदिवासी व अन्य संस्कृतीत डुकरांचं स्थान महत्त्वाचं आहे. चीनमध्ये डुक्कर हे त्यांच्या बाराव्या राशीचं प्रतीक आहे. चिनी संस्कृतीत डुक्कर हे ओज, चेतना आणि जीवनशक्तीचे प्रतीक मानण्यात येते. मलायन आर्चीपेलागोचा भाग असलेल्या बॅर्नियो (borneo) देशात जंगली डुकरांच्या कवटय़ा बहादुरीचे प्रतीक म्हणून ओळखल्या जातात आणि माणसाच्या मृत्यूनंतर त्याच्यासोबत दफन केल्या जातात. निकोबार बेटांवर सुद्धा डुकरांचे सांस्कृतिक दृष्टय़ा फार महत्त्व आहे. त्यांचे डुकरांबद्दलचे प्रेम वाखाणन्यासारखे असते, अगदी डुकराच्या प्रेमात त्यांनी गाणी आणि कवितासुद्धा लिहल्या आहेत. हिंदू धर्मात विष्णूचा तिसरा अवतार वराहाच्या स्वरूपातच होता. हिरण्ययक्ष नावाच्या राक्षसाने पृथ्वीला सागराच्या तळाशी लपवून ठेवले तेव्हा पृथ्वीला वाचवण्यासाठी विष्णूने वराहाचे रूप घेतले आणि सागराच्या तळातून धरतीची सुटका केली. याच काळापासून नव्या कल्पाची सुरुवात झाली.
डुकरांच्या मी नोंदवलेल्या एका विशिष्ट स्वभाव वैशिष्टय़ावर प्रकाश टाकू . गडचिरोलीच्या बसस्टँडवर उभा होतो. आपल्या ८-१० पिलांसह एक भली मोठी डुकरीण आरामात समोरून चालली होती. अचानक समोरून येणाऱ्या बसने एका मध्यम आकाराच्या डुकराला चिरडले. तो जागीच ठार झाला. अगदी दोन मिनिटांसाठी सर्व डुक्कर स्तब्ध झाले, पण दुसऱ्याच क्षणी त्यांनी मेलेल्या पिलाला खायला सुरुवात केली. पाच मिनिटांच्या कालावधीत हाडे आणि कवटीसह अख्ख पिल्लू डुकरांनी फस्त केलं आणि जणू काही काही घडलंच नाही या तोऱ्यात मजलदरमजल करीत तो काफीला निघून गेला.
बंगळुरला पोहचल्यावर प्रा. माधव गाडगीळांना हे निरीक्षण सांगितलं. त्यांनी सांगितलं की, ‘कॅनाबॅलीझमचा’ (स्वत:च्याच प्रजातीला खाऊन टाकण्याची प्रवृत्ती. ही प्रवृत्ती सस्तन प्राण्यामध्ये फारशी आढळत नाही.) हा एक प्रकार आहे. जेव्हा डुकरांना वाटलं की, आता आपल्या हातात काहीच नाही, तेव्हा संसाधन वाया न जाऊ देण्यासाठी त्यांनी स्वत:च फस्त करून टाकलं. यासाठी त्यांनी एक उदाहरण सांगितलं. हावर्ड विद्यापीठातून परतल्यानंतर ते पेपर व्ॉप्स (paper wasp) नावाच्या भिंगोटीच्या स्वभावाचा अभ्यास करत होते. भिंगोटीच्या एका वसाहतीत बऱ्याच भिंगोटय़ा आणि त्यांची अंडी होती. काही दिवसानंतर अंडय़ावर एक रोग आला आणि हळूहळू अंडी नष्ट व्हायला लागली. आता आपली अंडी वाचण्याची शाश्वती नाही हे जाणून भिंगोटय़ांनी स्वत:च ती फस्त करायला सुरुवात केली!
हे ऐकून फारच अंतर्मुख झालो. मानवी जीवन मूल्य आणि नैसर्गिक मूल्य यात बरीच तफावत आहे. निसर्ग फायदे आणि तोटे या तत्वावर चालतो. तिथे सीमित संसाधनातून जीवनाचा प्रवास कसा अखंडितपणे सुरू राहिल हे बघावं लागतं. संसाधन वाया घालवून चालत नाही. ते (उदा. प्रथिनं) तयार करण्यासाठी निसर्गाला बरीच मेहनत घ्यावी लागते, ते असेच वाया गेलेले चालत नाही. कोणत्याही परिस्थितीत संसाधनाचे रूपांतर ऊर्जेत व्हायला पाहिजे, ही निसर्गाची ठाम भूमिका असते.

(लोकसत्ता. विदर्भरंग. २९ मे २०११)

No comments:

Post a Comment