Sunday, May 29, 2011

आदिवासींचे निसर्ग संवर्धन

आदिवासींचे निसर्ग संवर्धन

आदिवासी आणि निसर्गावर अवलंबून असणारे लोक संसाधनांचा अती उपयोग किंवा दुरुपयोग करतात काय? गडचिरोली जिल्ह्यातल्या मेंढा लेखा ह्या गोंड आदिवासींच्या गावात दोन वर्ष वास्तव्यास असतांना या प्रश्नाचं उत्तर मला सापडलं आणि त्याच उत्तर आहे “नाही”. सोबतच आदिवासी हेच निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धनही करतात याचाही उलगडा झाला.

या संबंधात लोपेज, प्रा. माधव गाडगीळ सारख्या काही शास्त्रज्ञानी केलेले अभ्यास मला आठवले. आदिवासी जीवनात संसाधनांचा अतीवापर संभवतच नाही असे ते म्हणतात. जिथे आदिवासी आहेत तिथे तिथे जंगल अजूनही टिकून आहे या पेक्षा मोठा पुरावा आणखी काय असू शकतो! चार प्रमूख कारणांमुळे आदिवासी संसाधनांचा दुरुपयोग, अतिउपयोग करत नाहीत, एक म्हणजे संसाधन मिळवण्याच्या त्यांच्या ज्या पारंपरिक पद्धती असतात त्या फारच साध्या असतात, कितीही प्रयत्न केला तरी एका विशिष्ट काळात त्या पद्धतींनी अधिक संसाधने हाती लागत नाहीत.

दुसरी गोष्ट म्हणजे, संसाधनांवर अवलंबून असणारी लोकसंख्या. गडचिरोली जिल्ह्यात किंवा अन्य ही आदिवासी क्षेत्रात लोकसंखेची घनता अन्य भागाच्या तुलनेत फारच कमी आहे, त्याचाही परिणाम एकुणच संसाधन कमी वापरण्यात होत असतो.

तिसरी गोष्ट म्हणजे विविध प्रकारच्या संसाधनांचा उपयोग करण्याची पद्धती ज्याला परीस्थितिकी शास्त्रात ’बहू संसाधन उपयोग पद्धती’ (Multiple Resource Use Strategy) असे म्हणतात. एकाच प्रकारच्या संसाधनांवर लोक जर अवलंबून असले तर ते विविक्षित संसाधन हा हा म्हणता संपून जाऊ शकते, पण वापरायला अनेक प्रकारची संसाधने उपलब्ध असल्याने निसर्गचक्रात सर्वच संसाधनांचा वापर एका नंतर एक करता येतो. ज्या वेळी एक प्रकारचे संसाधन फळण्याच्या (प्रजननाच्या) प्रक्रियेत गुंतलेले असते तेव्हा अन्य संसाधनांचा विकल्प उपलब्ध असल्याने पहिल्या संसाधनाला फळण्यासाठी बरीच उसंत मिळालेली असते.

आणि चौथी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, संसाधनांचा विवेकशील उपयोग करण्याला कारणीभूत असणारे अलिखित सामाजिक संकेत, परंपरा व धार्मिक नियम.

निसर्गावर आश्रित असलेले लोक पारंपरिक पद्धतीत दोन स्तरांवर निसर्ग संवर्धनाचे प्रयत्न करतात असे अभ्यासक मानतात. एक म्हणजे प्रजातीच्या पातळीवर (Species Level), म्हणजे एखाद्या प्रजातीला अभय प्रदान करणे. उदा. माकडाला भारतातल्या बहुतांश भागात अभय प्रदान केलेलं आहे किंवा वडा पिंपळाच्या झाडांना कापण्यावर बंदी घातलेली असते. दुसरी पातळी म्हणजे, परिसंस्थेच्या पातळीवर (Ecosystem Level). उदा. देवराया आणि पवित्र कूंड. देवराई म्हणजे देवाच्या नावाने राखलेले जंगल. इथल्या झाडांना तोडायला बंदी असते. पवित्र तळ्यातील मास्यांना किंवा पाणपक्षांना पकडण्यावर धार्मिक बंदी असते. प्रजातीच्या पातळीवर केल्या जाणाऱ्या निसर्ग संवर्धनात काही प्रजातींना पवित्र मानणे, काही प्रजातींचा उपयोग धार्मिक व मंगल कार्यात करणे, काही विशिष्ठ वयात काही प्रजातींचा उपयोग अन्न म्हणून न करणे, काही विशिष्ट काळातच प्रजातींचा उपयोग करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होतो.

मेंढ्यातील गोंड लोकात विविध गोत्राचे (आडनावांचे) लोक विविध प्रकारच्या प्राणी वनस्पतीना देव मानतात, ज्याला इंग्रजीत ’टोटेमीक स्पेसीज’ (Totemic Species) असे म्हणतात. भारतात अंदाजे ३००० च्या आसपास विविध लोकसमूह आहेत. त्यातील जवळ जवळ १००० जनजाती ह्या वनस्पती प्राण्यांना देव मानतात. गोंड लोक हे मुळत: निसर्ग पूजक आहे. गोंड लोकात विविध आडनाव असणाऱ्या लोकांचे विविध देव असतात. ते साधारणत: वनस्पती किंवा प्राणी असतात. लोक समजतात की त्यांच्या कुल देवतेच्या प्रजातींपासून त्यांचा वंश पुढे चालत आला आहे. आपल्या कुलदेवतेला लोक खात नाहीत किंवा कोणतीही इजा करत नाही.

उदाहरणार्थ ’हलामी’ आडनावाच्या लोकांनी बोद मासा खाऊ नये असा नियम आहे तर ’नैताम’ आडनावाच्या व्यक्तिंनी कासव, ‘दुगा’ हे सापाला देव मानतात तर ’हिचामी’ एक प्रकारच्या किटकाला, ’गावडे’ निल गाईला माता मानतात तर ’कुमोटी’ आंब्याच्या झाडाला. मेंढ्यात प्रत्येक आडनावाच्या व्यक्तिचे कोणते देव आहेत याची मी यादी तयार केली, तेंव्हा मी आश्चर्यचकीत झालो, कारण अगदी किटकांपासून तर सस्तन प्राण्यांपर्यंत प्रत्येक वंशाचे आपले देव होते. अशा प्रकारे विविध वंशाच्या लोकांनी काही विशिष्ठ प्रजातींना अभय देण्याचं कारण आहे, एका विशीष्ठ गटाने एखादी प्रजात वापरली नाही म्हणजे ती इतरांना वापरायला मोकळी असते त्यामुळे एकाच प्रजातीवर ताण येत नाही.

ज्या प्रमाणे काही विशिष्ट प्रकारच्या प्रजाती काही आडनावाचे लोक खात नाहीत किंवा इजा करत नाहीत तसच काही विशिष्ट वयातल्या व्यक्तिंनी काही विशिष्ट प्रकारचे प्राणी खाऊ नये असा प्रवाद आहे. उदा. लग्नाआधी करीयाल उसीड (दयाळ पक्षी), बेहरा किडेर (सुतार पक्षी), काकड (कावळा) इत्यादी पक्षी खाऊ नये असा दंडक आहे.

आपण विचार करुया की जर फळं परिपक्व होण्याआधीच लोकांनी एकमेकात स्पर्धा करुन ती तोडायला सुरुवात केली तर एकतर चांगल्या प्रतीची फळे मिळणार नाहीत आणि निसर्गाचेही नुकसान होईल. यासाठी काही विशिष्ठ तिथी नंतरच एखादी विशिष्ट गोष्ट वापरावी असा अलिखित नियम आदिवासी भागात आहे. उदा. चिचोडा भाजी (एक प्रकारची जंगली भाजी), आवळा, करवुल माटी (एक प्रकारचा जंगली कंद) ह्या गोष्ठी चुरनाच्या (चुरना = धान कापणी व मळनी = डिसेंबर जानेवारी) आधी खाऊ नयेत असा नियम आहे. तर पळसवेल, वराली (एक प्रकारची जंगली भाजी), चहा डोडो हे आखाडी (जुलै - गस्ट) च्या पुर्वी वापरात आणत नाहीत. आदिवासी समाजात पोलोची प्रथा पाळली जाते. पोलो म्हणजे सुट्टीचा दिवस. त्या दिवशी कोणतेही शेतीकाम किंवा अन्य काम करत नाही, त्या दिवशी देवपूजा केली जाती. बऱ्याच प्रजाती ह्या पोलो नंतरच वापरल्या जातात.

आता आपण विविध प्रकारच्या आधिवासाच्या पातळीवरच्या निसर्ग संवर्धनाच्या पारंपरिक प्रयत्नांचा आढावा घेऊया. आधुनिक समाजात सरकारी प्रयत्नांनी घोषित केलेले वन्य जीव अभयारण्य, राष्ट्रीय उद्यानं इत्यादी असतात. आदिवासी समाजातही काही जागांना त्यातील विविध जीवजातींसह अभय दिलेलं असतं. यातला पहिला प्रकार म्हणजे देवराई. अशी एक देवराई मेंढ्यातही आहे. यातला दुसरा प्रकार असतो पवित्र तळी किंवा डोह. ह्या कुंडी’, ’वादादीन’, ’देव डोह’ सारख्या ठिकाणी लोक मासे पकडत नाहीत. अशी ठिकाणं म्हणजे माश्यां दृष्टीने मेंढ्याच्या लगतहुन वाहणाऱ्या कठाणी नदीवरील ’देवुर साठी एक प्रकारची अभयारन्ये (की अभयकुंडे! refugia) असतात.

अशा प्रकारे अजूनही भारतातल्या अनेक भागात पारंपरिक पद्धतीने निसर्ग संवर्धनाचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्य प्रवाहातल्या समाजाने निसर्गाला वाचवण्यासाठी या सर्व निसर्ग मित्रांपासून शिकण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी नवीन पिढी निसर्गापासून दूर जात असल्याने असे प्रयत्न हळुहळू लोप पावतांना सुद्धा दिसतात. निसर्गाबद्दलचे पारंपरिक ज्ञान व पारंपरिक निसर्ग संवर्धनामध्ये निकटचा संबंध आहे. पारंपरिक ज्ञान जर नष्ट होत असेल तर पारंपरिक निसर्ग संवर्धनाच्या व्यवस्था टिकणार नाहीत. यासाठी पारंपरिक ज्ञानाच्या दस्तावेजीकरणाला, उपयोगाला व त्या ज्ञानाच्या उपयोगापासून मिळणा-या फायद्याच्या न्याय्य वाटपाला प्रमोट करण्याची गरज आहे.

No comments:

Post a Comment