Sunday, May 29, 2011

मानव वन्यजीव संघर्षाचा वाढता आलेख

मानव वन्यजीव संघर्षाचा वाढता आलेख

अमरावती जिल्ह्यातल्या पिंपळखुटा गावातला एक युवा शेतकरी सकाळी शेतात जातो आणि शेतीची रानडुकरांनी केलेली नासधूस बघून त्याला धक्का बसतो. तो घरी येतो आणि विष प्राशन करुन आत्महत्या करतो. गेल्या वर्षी कारंजा लाड तालुक्यातील खेर्डा गावच्या एका मजूराला धडक मारुन नीलगाईने जागीच ठार केले. कारंजा तालुक्यातल्याच बेंबळा गावातल्या एका तरुणाला रानडुकराने असेच ठार केले होते. ह्या आणि अशा घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. वन्यजीव आणि मानूस ह्यांच्यातल्या परस्पर संघर्षाची तीव्रता वाढत चालल्याची दिसते. ह्या घटनांचा परिसर विज्ञानाच्या अंगाने मुलभूत विचार करण्याची गरज आहे. रानडुकरांची, हरणांची, नीलगाईंची, माकडांची संख्या का वाढली ? याचा निसर्ग नियमांच्या अनुषंगाने विचार करुन मूलभूत उपाय करण्याची गरज आहे.

१९६९ मध्ये राबर्ट पायने (Robert Paine) नावाच्या शास्त्रज्ञाने परिसर विज्ञानातली ‘की स्टोन स्पेसिज’ (Keystone Species) नावाजलेली संकल्पना दिली होती. की स्टोन स्पेसिज चे मराठीत भाषांतर आपण ‘मूलभूत संसाधन’ असे करुया. ष्ट्रेलिया मधील ग्रेट बॅरीयर रिफ मध्ये केलेल्या संशोधनाच्या आधारावर पायने याने ही संकल्पना दिली. ग्रेट बॅरीयर रिफ हा खुप चांगली जैवविविधता असलेला समूद्राच्या खारफूटी जंगलाचा (Mangrove) भाग. ह्या परिसरात तारा मासा (Pacific north west startfish) आणि मोठ्या आकाराची गोगलगाय (Large snail) हे दोन महत्त्वाचे मांसाहारी जीव आढळतात. पायनेच्यानुसार जर ह्या दोन्ही जीवांना त्यांच्या अधिवासातुन काढून टाकलं तर हे दोन जीव ज्या भक्षांवर अवलंबून असतात त्या भक्षांचं प्रमाण सुरुवातीला अनेक पटींनी वाढते आणि पर्यायाने संपूर्ण परिसंस्थेचा नाश होतो. म्हणजेच काय तर ह्या संकल्पनेनुसार परिसंस्थेत काही जीवांवर संपूर्ण परिसंस्थेचे आरोग्य अवलंबून असते. जर अशा जीवांची संख्या घटली तर पर्यायाने संपूर्ण परिसंस्थेचाच तोल जातो. अशा जीवांना की स्टोन स्पेसीज म्हणतात. एकेकाळी विदर्भात भरपूर प्रमाणात आढळणारे चित्ते, वाघ, बिबटे, लांडगे, कोल्हे हे सर्व मांसाहारी जीव आपल्यासाठी की स्टोन स्पेसीज होते. एका अर्थाने शाकाहारी जीवांच्या प्रमाणावर नियंत्रण ठेऊन ते जंगलाचे आणि शेतीचे रक्षणच करायचे.

असे मांसाहारी जीव जरी संखेने कमी असले तरी त्यांच्यावर निसर्गाने अनेक जबाबदा-या दिल्या आहेत. ते जंगलांचे, वनस्पतींचे खरे रक्षक आहेत. कारण, वनस्पतींवर जगणाऱ्या शाकाहारी प्राण्यांच्या संख्येवर ते नियंत्रण ठेवतात. त्यांच्या मुळे शेती सुरक्षीत राहते. शेतीची नासधूस शाकाहारी वन्य जीव का करतात? किंवा पाळीव प्राण्यांना मांसभक्षी वन्य प्राणी आपले लक्ष का बनवतात? परिस्थितीकीय ज्ञानाच्या अंगाने ह्याचा विचार आपण करुया. १९६६ मध्ये मॅकआर्थर आणि पियांका (MacArthur and Pianka) ह्या दोन अभ्यासकांनी परिस्थितीकी शास्त्रातली पटीमल फोरेजींग थेअरी” (Optimal foraging theory) नावाचे तत्व विषद केले. ह्या तत्वानुसार कोणताही जीव हा कमीत कमी काळात जास्तीत जास्त उर्जा मिळवण्याची पद्धती शोधत असतो. दुस-या शब्दात कमीत कमी काळात जास्तीत जास्त पोषक अन्न मिळवण्याकडे प्रत्येकाचा कल असतो. म्हणजेच शेतीत उगवलेले उत्तम असे अन्न जर रानडुकरांना किंवा गोठ्यात बांधलेली गाय वाघाला कमीत कमी काळात मिळत असेल तर नैसर्गिक अन्न हुडकण्याकडे त्यांचा फारसा कल नसतो.

प्रत्येक जिवांचे विशिष्ट असे अधिवास असतात, त्यांच्या विशिष्ट अशा पर्यावरणीय गरजा असतात. त्यांच्या अधिवासात जर बदल झाले तर आपोआपच त्यांच्या संख्येवर प्रतिकूल असा परिणाम होतो. अशा मांसाहारी प्राण्यांचे अधिवास आपण नष्ट केल्याने त्यांची संख्या कमालीची घटली. चित्ते तर भारतातून संपूर्णपणे नामशेष झाले. हे मांसभक्षी जीव कमालीचे कमी झाल्याने विदर्भातील रानडुक्कर, नीलगाय, हरीण, माकड यांची संख्या कमालीची वाढली आहे ज्याचा पहिला परिणाम शेतीवर व्हायला लागला आहे. एकीकडे शाकाहारी जिवांना पोसणारी जंगले कमी होत चालली आणि दुसरीकडे शेती फोफावत चालली परिणामत: आपली भूक भागवण्यासाठी ह्या शाकाहारी जिवांनी आपला मोर्चा शेतीकडे वळवला यात नवल ते काय? आज आपल्याकडे शेतीच्या नाशासाठी जंगली जनावरांचा उपद्रव हा महत्त्वाचा त्रास असल्याचे लोक सांगतात. त्याचवेळी ह्या शाकाहारी जिवांचा लोकांना शारीरिक इजा सुद्धा व्हायला लागली आहे. रानडुकरांनी, बिबट्याने किंवा निलगाईने जखमी केल्याच्या, जीवे मारल्याच्या अनेक घटना निरंतर वर्तमानपत्रातून येत असतात. या घटनांचा एकच अर्थ आहे की माणसाने वन्य जिवांच्या अधिवासात अतीक्रमण केले. माणुस असो की वन्यप्राणी आपल्या घरात झालेले अतीक्रमण सहन करत नाही आक्रमक होतो हे साधेसे तत्व ह्या मागे आहे.

अशा परिस्थितीत रानडुकरांच्या किंवा हरणांच्या शिकारीला नियंत्रित परवानगी देणे हे एक समाधान असू शकते पण संपूर्ण उपाय निश्चितच नाही. संपूर्ण उपायात मांसाहारी जिवांचे अधिवास पुन्हा पुनरुज्जीवीत करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. असे अधिवास ज्यात प्रामुख्याने जंगलांचा समावेश होतो पुन्हा पुनरुज्जीवीत करण्याची तातडीने गरज आहे. हे काम लोक सहभागाने, रोजगार हमी योजनेसारख्या योजनांच्या प्रभावी अमंलबजावणीने होऊ शकते. जर हे करण्यात आपण कमी पडलो तर शेतीचा व उरलेल्या जंगलांचा असाच नाश होत राहील. त्यामुळे शेतीच्या दृष्टीने विचार केल्यास आसपास जंगलाचे प्रमाण व्यवस्थित प्रमाणात असणे हे केवळ शाकाहारी जिवांच्या दृष्टीनेच चांगले नाही तर इतर अनेक बाबतीत हे महत्त्वाचे आहे. दुसरा भाग आहे वन्य प्राण्यांमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्याच्या बाबतीत. ज्या गरीब शेतक-यांना वन्य प्राण्यांमुळे त्रास सोसावा लागतो अशा शेतक-यांना किंवा आदिवासींना नुकसान भरपाईच्या निर्दोष अशा यंत्रणेचा आपल्याकडे अभाव आहे. दफ्तर दिरंगाईमुळे, नुकसान मोजण्याची निर्दोष पद्धती नसल्यामुळे व नुकसान भरपाईबद्दलच्या चांगल्या धोरणाच्या अभावाने अनेकदा व्यवस्थित नुकसान भरपाई मिळू शकत नाही. याबाबतीत सरकारी स्तरावर धोरणात्मक बदलाची नितांत आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment