Sunday, May 29, 2011

जैवविविधता -निसर्गाचे मूळ तत्व

जैवविविधता -निसर्गाचे मूळ तत्व

ब्राझीलमधील रिओ-डी-जानेरो शहरात ३ जून ते १४ जून १९९२ दरम्यान वसुंधरा परिषद आयोजित करण्यात आली होती. त्या परिषदेत जैवविविधतेचे संवर्धन, शाश्वत व टिकाऊ उपयोग आणि फायद्याच्या न्याय्य वाटपाच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय करार पारित करण्यात आला. या करारातील नमूद बाबी २२ मे १९९२ पासून सर्व परिषदेत सामील झालेल्या राष्ट्रांनी मान्य केल्या. तेव्हापासूनच हा दिवस आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
१५ ते २० अब्ज वर्षांपूर्वी ऊर्जेने परिपूर्ण अशा अणूंपेक्षाही छोटय़ा आकाराच्या कणांमध्ये (Sub atomic particles) महाविस्फोट (Big Bang) होऊन ब्रह्मांडाचा जन्म झाला. विस्फोटानंतर क्षणार्धातच हायड्रोजन आणि हिलियमसारख्या अत्यंत साध्या अणूंची उत्पत्ती झाली. त्या आधी पदार्थ म्हणा किंवा ऊर्जा अगदी ठासून एका ठिकाणी बंदिस्त होती. स्फोटामुळे ऊर्जा बाहेर पडली, तिचा पसरायला लागली आणि आजच्या सतत विस्तार पावणाऱ्या ब्रह्मांडाचा जन्म झाला. जसजसे अणू थंड व्हायला लागले तसे गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे त्यांचे संघनन व्हायला लागले आणि ताऱ्यांचा जन्म झाला. सोलर नेब्युला (ज्यापासून पुढे सौर कुलाचा जन्म झाला) हा अशाच असंख्य तारकासमूहांपैकी एक तप्त, ऊर्जेने ठासून भरलेला गोळा होता. ४.६ अब्ज वर्षांआधी सोलर नेब्युलाच्या शेजारी असलेल्या तारकासमूहाने निर्माण केलेल्या अती ऊर्जा तरंगामुळे (Shock Wave) नेब्युलाला स्वत:च्या आसाभोवती फिरण्याची गती मिळाली. नेब्युलाच्या मध्यभागी (हाच आपला सुर्य) असलेल्या हायड्रोजन आणि हिलियमला वर्तुळाकार फिरण्याने गतीज ऊर्जा (Kinetic energy) प्राप्त झाली. हायड्रोजनचे हिलियममध्ये आणि हिलियमचे हायड्रोजनमध्ये रूपांतरण होण्याच्या प्रक्रियेत ऊर्जा उत्पन्न व्हायला लागली. सूर्य प्रकाशमान झाला. सूर्याच्या आसपास पसरलेल्या छोटय़ा छोटय़ा (!) तुकडय़ांमध्ये एक तुकडा होता पृथ्वी नावाचा.
कालांतराने पृथ्वी आणि इतर अणू थंड व्हायला लागले. पृथ्वीवर मात्र काही वेगळ्या घटना घडल्या. हायड्रोजनचे दोन अणू प्राणवायूचा एक अणू अशी भागीदारी होऊन पाण्याची उत्पत्ती झाली. हे पाणी पृथ्वीवरच्या विशाल डबक्यांमध्ये साठून सागरांची, महासागरांची उत्पत्ती झाली. अशा प्रकारे निर्माण झालेल्या महासागरातल्या उष्ण पाण्यात अनेक कार्बन, नायट्रोजन, फॉस्फरस इत्यादीसारखी साधी मूलद्रव्ये होती. उष्ण पाण्याच्या या अनेक मूलद्रव्यांनी बनलेल्या ‘मसालेदार’ द्रावणाला ‘प्रायमॉरडियल हॉट सुप’ (अती प्राचीन उष्ण कढी!) म्हणतात. अशा कढीमधल्या विविध रेणूंमध्ये लाखो वर्षांपर्यंत संबंध येते राहिले आणि ३.५ अब्ज वर्षांआधी, जो स्वत:सारखीच एक ‘झेरॉक्स प्रत’ निर्माण करू शकेल, अशा क्लिष्ट शंृखलेचा जन्म झाला. तोच पहिला जीव, तीच जीवनाची सुरुवात. तीच जैवविविधतेच्या निर्माणाची सुरुवात. अशा साध्याशा जीवामध्ये करोडो वर्षांच्या कालखंडात उत्क्रांती होत जाऊन आजची समृद्ध जैवविविधता निर्माण झाली.
जीवनाच्या एकूणच उत्पत्ती आणि विकासाचा जर आपण आढावा घेतला तर दोन गोष्टी प्रकर्षांने जाणवतात, एक म्हणजे जीवन हे अधिकाधिक क्लिष्ट (Complex) होत गेलेले आहे आणि दुसरे म्हणजे अधिक विविधतापूर्ण (Diverse) झालेले आहे. पृथ्वीवरील जीवनाच्या सुरुवातीचे जीव हे अतिशय साधे होते. प्रथिनांपासून बनलेल्या एका भिंतीच्या आत जीवनावश्यक सर्व क्रिया चालायच्या. दोन महत्त्वाच्या गोष्टी प्रत्येक जीव करत असतो. एक म्हणजे पर्यावरणातून अन्न घेऊन त्यांचे रूपांतर ऊर्जेत करणे आणि दुसरे म्हणजे आपल्यासारखाच जीव निर्माण करणे. जेणेकरून जीवनाचा प्रवाह अखंडित सुरू राहील. ऊर्जानिर्मिती आणि प्रजनन, अशा क्रिया त्या सुरुवातीच्या जीवात चालायच्या. आजच्या क्लिष्ट गुंतागुंतीच्या संरचना त्यात निर्माण झालेल्या नव्हत्या. दुसरी गोष्ट म्हणजे, सर्व जीव हे एकसारखेच होते. आजच्या सारखी विविधता ज्याला ‘जैवविविधता’ (Biodiversity) म्हणतात त्यात निर्माण झालेली नव्हती, पण जसजसा काळ पुढे सरकत गेला तसतशी विविधता वाढत गेलेली आपल्याला आढळते.
निसर्गाला काय गरज होती असं करायची? इतके विविध प्रकारचे जीव! त्यांच्या जगण्याच्या असंख्य पद्धती? हे सारं कसं तयार झालं? का तयार झालं? कोणी तयार केलं, या प्रश्नाचे उत्तर प्रथमत: सुसुत्रीतपणे शास्त्रीय आधारावर चार्लस डार्विन या शास्त्रज्ञाने दिले.
आज आपल्याला पंधरा लाख प्रकारचे जीव माहिती आहेत. म्हणजेच, इतक्या जीवांना विज्ञान नाव देऊ शकले आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार ८० ते १ कोटी २० लाख प्रकारचे जीव असावेत. विष्णू पुराणात म्हटले आहे की, प्रत्येक जीवाला निर्वाणापर्यंत पोहोचायला ८४ कोटी योनीतून जावे लागते. आधुनिक विज्ञान मानते की, ८० ते १ कोटी २० लाख प्रकारचे जीव असावेत. दोन्ही हिशोब कुठे तरी जुळत आहेत.
इतके विविध प्रकारचे जीव निर्माण झालेत? निसर्ग निवडीतून (Natural Selection) संसाधन मर्यादित असतात. जगण्यासाठी अन्न, राहण्यासाठी जागा या मर्यादित असतात पण, जीव अमर्याद असतात. अशा परिस्थितीत जगण्यासाठी दोन प्रकारच्या जीवात स्पर्धा सुरू होते. कारण, जिवंत राहणे हा प्रत्येक जीवाचा मुलभूत स्वभाव आहे. कसेही करून जगा, असा संदेश निसर्ग देत राहतो. आत्महत्या हा जीवनाचा स्वभावच नाही. अशा प्रकारच्या संघर्षांत दोन मार्ग असतात. एक तर आपले मार्ग इतरांपेक्षा वेगळे करा किंवा जो ताकदवान असेल तो टिकेल. आपले मार्ग वेगळे करणे म्हणजे विविध प्रकारचे संसाधन वापरायला लागेल. विचार करा, जर सर्व जीव पाण्यातच राहिले असते तर, पाण्यातील संसाधने आणि जागा केव्हाच संपून गेल्या असत्या. त्यामुळे काही जीवांना पाणी सोडून जमिनीवर सुद्धा यावं लागलं. यामुळे दोन प्रकारचे जीव निर्माण झाले, पाण्यातले आणि जमिनीवरचे.
अशा या अद्भुत जैवविविधतेने संपूर्ण पृथ्वी व्यापलेली आहे. जैवविविधतेच्या अशा जाळ्यांमध्ये परस्पर सहसंबंध अचंबित करणारे असतात. अनेक जीव एकमेकांवर विविध प्रकारचे प्रभाव टाकतात. एकमेकांशी स्पर्धा करत, एकमेकांना मदत करत जगत असतात. परिसंस्थेच्या बाबतीत विचार करू या. परिसंस्थेत प्रजातींची विविधता जितकी जास्त असते तितकीच त्याची शाश्वतता जास्त असते. अशी परिसंस्था अनेक जीवांना आधार देऊ शकते. तिची धारण क्षमता (Carrying capacity) अतिशय जास्त असते. अशी परिसंस्था तिच्यात होणाऱ्या नकारात्मक बदलांना आपोआपच कमी करू शकते.
जैवविविधतेच्या बाबतीत भारत समृद्ध प्रदेश आहे. जगातल्या काही मोजक्या जैवविविधता संपन्न राष्ट्रांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. परिस्थिती की शास्त्रात एक नियम आहे. अधिवासांची विविधता जितकी जास्त असते तितकीच विविध परिस्थितीकी शास्त्रात एक नियम आहे. अधिवासांची विविधता जितकी जास्त असते तितकीच विविध प्रजातींचीसुद्धा असते. भारतात अधिवासांची विविधता अत्यंत उच्च कोटीची आहे. काही महत्त्वाच्या अभ्यासल्या गेलेल्या प्रजातींची भारतातली संख्या तक्तयात दर्शवली आहे.
जैवविविधता व माणूस, त्याची संस्कृती, खाद्य जीवन, कला, साहित्य यांचा घनिष्ठ संबंध आहे.
गडचिरोली जिल्ह्य़ातल्या मेंढा लेखा गावात वास्तव्यास असताना आम्ही लोकांना माहित असलेल्या सुमारे ६०० प्रजातींची यादी केली होती. गवताच्या ३० ते ४० प्रजाती सहजतेने तिथला दुक्कू काका सांगू शकायचा. एखाद्या निष्णात अशा वनस्पती शास्त्रज्ञालाही लाजवेल असे हे ज्ञान. खाद्याच्या बाबतीत ४५ प्रकारच्या जंगली भाज्या, अनेक प्रकारचे कंद, माशांच्या अनेक प्रजातींचा उपयोग इथला माणूस सहजतेने करताना आढळतो. निसर्गाबद्दलच्या लोकांच्या अतिशय छोटय़ा छोटय़ा निरीक्षणातून अनेक शास्त्रीय रचना असणाऱ्या गोष्टी माहिती होतात. ग्रिनेल नावाच्या शास्त्रज्ञाने एस्किमोंबद्दल लिहिलंय, ‘एस्किमो ३० विभिन्न प्रकारच्या बर्फाना ओळखू शकतात तर, १० विविध प्रकारच्या चिखलांना वेगवेगळी नावं त्यांनी दिली आहेत. त्यांचे जगणे हे त्या फरकावरच अवलंबून आहे. हेच मेंढय़ातल्या आदिवासींबद्दल बघायला मिळते. गडचिरोलीत पाणगळीच्या प्रकारातल्या जंगलात जैवविविधतेचा मोठा साठा आहे. अशा जैवविविधतेच्या अमाप संपत्तीमुळे इथल्या माणसाच्या जीवनशैलीत प्रचंड विविधता आहे. अनेक प्रजाती वापरायला उपलब्ध असल्याने बहु संसाधन वापर पद्धत (Multiple Resource Use Strategy) इथल्या लोकांनी अंगीकारली आहे. अनेक प्रजातींच्या वापरामुळे कोणत्याच विविक्षित अशा प्रजातीवर ताण येत नाही आणि निसर्गाचं नुकसान होत नाही. जसं जंगलाच्या बाबतीत आहे तसंच शेतीच्या बाबतीत. शेतीत अजूनही धानाच्या पारंपारिक प्रजातीच जास्त प्रमाणात वापरात आहेत. त्यामुळे अजूनही पारंपारिक वाणांचा जनुकीय साठा इथे संरक्षित आहे.
एकूणच काय तर, जैवविविधता आणि लोकं यांचा अतुट असा संबंध सगळीकडे बघायला मिळतो आणि एक तत्व गवसते की, जर जैवविविधता अबाधित राहिली तरच लोकांचं जीवन, त्यांची संस्कृती, लोक-ज्ञान, परंपरा, सवयी अबाधित राहतील. जसजशी जैवविविधता संपून एकसुरीपणा (Monoculture) वाढीला लागेल तसतसे अनेक सामाजिक, सांस्कृतिक, आíथक प्रश्न निर्माण होत जातील. दुर्दैवाने आज अनेक कारणांनी जैवविविधतेचा मोठा ऱ्हास होतांना दिसून येत आहे.
वनस्पती, प्राण्यांचे अधिवास नष्ट होणे, परदेशी प्रजातींची संख्या वाढणे, संसाधनाचा अविवेकी वापर, प्रदूषण यासारख्या कारणांनी जैवविविधतेचा अनमोल ठेवा नष्ट होत आहे. दुर्दैवाने एकसुरीपणाकडे आपली वाटचाल होत असलेली दिसून येते. २००३ पासून मेंढय़ाजवळून वाहणाऱ्या कठाणी नदीत चीनमधल्या नदीत स्थानिक माशांसाठी कर्दनकाळ असणारा ‘तिलापीया’ नावाचा मासा दिसायला लागला आहे. आज जागतिक स्तरावर जैवविविधता नष्ट होण्यात अधिवास नष्ट होण्याबरोबरच परदेशी प्रजातींचे वाढते प्रमाण हेही महत्त्वाचे कारण दिले जाते. म्हणजेच काय तर स्थानिक माशांची विविधता हळूहळू धोक्यात आहे.
अशा परिस्थितीत जैवविविधतेच्या महत्त्वाच्या बाबतीत सर्वानी गंभीरतेने विचार करून मार्ग शोधण्याची गरज आहे. जैवविविधतेवर आधारित लोक समूहांसोबत मिळून त्यांच्या रोजगाराला शाश्वतता प्रदान करून जैवविविधता संवर्धन, शाश्वत उपयोग व फायद्याच्या न्याय्य वाटपाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याची नितांत आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment